ड्रेनेजचे पाणी खाम नदीत सोडले

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिका प्रशासन मागील ६ ते ७ वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. मात्र, असे असतानाही महापालिकेच्या अभियंत्यांकडूनच खाम नदीच्या पात्रात व्हॅक्यूम मशीनमधील ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येत आहे. याबाबतचा व्हिडिओ यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांना प्राप्त होताच त्यांनी उपअभियंता आणि वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले.
मनपाकडून शहरातील खामनदीला पुनरुजीवित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. ठिकठिकाणी नदीपात्राच्या नैसर्गिक रुंदीतील अतिक्रमण काढून ते पूर्ववत करण्यात आले. दगडांची पिचिंग करून रेडलाईन, ब्लू लाईन तयार करण्यात आली. नदीला पूर्वीप्रमाणे रूप देत ९० टक्क्यांपर्यंत दुर्गंधीयुक्त पाणी बंद करण्यात यश आले आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणाहून वाहत येणार्‍या ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटदेखील उभारण्यात आले आहे. कोट्यवधीचा खर्च करण्यात आला आहे. अजूनही या नदीची देखभाल आणि त्यात वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहे. परंतु त्याच प्रयत्नांना महापालिकेचे काही अधिकारी, कर्मचारी खोडा घालत आहेत. त्याबाबतचा एक व्हिडीओ कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांना प्राप्त झाला. त्यात महापालिकेच्या व्हॅक्यूम मशीनद्वारे ड्रेनेज स्वच्छता करून साठवून आणलेले घाण पाणी वाहनचालक खाम नदीपात्रात सोडत असल्याचे दिसत आहे.